आता सरकार धनादेशावरही आधार नंबर लिहिणे सक्तीचे करणार आहे का? हा प्रश्न विचारण्यामागचे कारण म्हणजे चालू खात्याच्या धनादेशावर आधार नंबरलिहिण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या नव्या पर्यायामुळे व्यापारी वर्गांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राज फॅब्रिक्सच्या मालकाला एका पार्टीने नुकताच त्यांचा धनादेश परत पाठवला. या धनादेशावर आधार नंबर लिहिलेला नसल्याने तो वटणार नसल्याचं या पार्टीचं म्हणणं होतं. राज फॅब्रिक्सच्या मालकानं या धनादेशावरील आधार नंबर लिहिण्याचा पर्याय पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकीतच झाले. ‘आता हा पर्याय वैकल्पिक आहे. पण सरकार ज्या पद्धतीने गुपचूप निर्णय घेऊन ते निर्णय सक्तीचे करते, त्याचप्रमाणे हा निर्णयही सक्तीचा केला जाईल. त्यात आश्चर्य वाटायला नको. जर खरेदी करणारा आणि विक्रेता दोघांचेही बँक खात्याचे नंबर आधार आणि पॅन कार्डशी लिंक आहेत. तर मग पुन्हा धनादेशावर आधार नंबर लिहिण्याची गरजच काय? या मागे सरकारचा काय हेतू आहे?,’ असा सवाल राज फ्रॅब्रिक्सच्या मालकाने केला.